Blog Author  
रवि आमले

त्यांचा इमोशनल जयजयकार...

mumbai metro blog - saregamapa

सारेगमप लिटिल चॅम्प्स. टीव्हीवरचा गाण्यांचा एक रिएलिटी शो तो काय! पण अवघा महाराष्ट्र त्यात एवढा गुंतला, की नंतर नंतर तो फक्त टीव्हीवरचा कार्यक्रम राहिला नाही. त्या वीस-एकवीस इंची पडद्याच्या सीमा त्याने केव्हाच पार केल्या. प्रत्येक मराठी माणसाच्या भावविश्वाचा तो भाग बनला. केवळ मराठीच कशाला? ज्यांनी ज्यांनी तो कार्यक्रम पाहिला, ते ते त्याच्या प्रेमात पडले. मुंबईत तर हे अधिक प्रकर्षानं जाणवत होतं.

या कार्यक्रमाने सगळ्या महाराष्ट्राला मोठ्या कोड्यात टाकलं होतं. अंतिम फेरीत आलेल्या मुग्धा, कार्तिकी, आर्या, रोहित आणि प्रथमेश या पाच मुलांचं कौतुक कोणत्या शब्दांत करावं, हेच महाराष्ट्राला कळत नव्हतं. मराठीतली सगळी विशेषणं जणू त्यांच्या कौतुकासाठी अपुरी पडत होती. घराघरात हीच भावना होती. आणि या भावनेमुळेच अंतिम फेरीत कोणीही एक विजयी ठरू नये, तर सगळ्यांच्याच शिरी विजेतेपदाचा मुकुट ठेवण्यात यावा, असं सगळ्यांना - सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना - वाटत होतं.

आश्चर्य याचंच वाटतं, की त्या मुलांचीही तीच इच्छा होती. मुग्धा किंवा कार्तिकी यांचं वय लहान म्हणून त्यांना स्पर्धा वगैरे गोष्टींची जाणीव नाही असं मानलं, तरी रोहित, प्रथमेश किंवा आर्या यांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकत नाही. स्पर्धा म्हणजे काय, हे त्यांना समजत असणार. पण कार्तिकी महागायिका झाल्याचं घोषित झाल्यानंतर रोहितने केलेला तिच्या नावाचा जयजयकार, मुग्धाने तिला मारलेली मिठी, आर्या-प्रथमेशने हासत केलेला त्या घोषणेचा स्वीकार, यातून फक्त त्या मुलांमधला नितळ थोरपणाच दिसत होता. कार्तिकीने तर यावेळी कमालच केली.

"मला अजिबात वाटलं नव्हतं की मी महागायिका होईन. खरं तर आम्ही सगळेच विजयी आहोत," हे एरवी दुसरं कोणी म्हणालं असतं, तर ते स्वच्छ खोटं वाटलं असतं. बेगडी विनयाचं वाटलं असतं. पण कार्तिकीच्या त्या बोलण्यात तिच्या सुरांइतकीच सच्चाई होती. खरं गाणं माणसाला किती उंच करतं!

कार्तिकी महागायिका झाल्याचं ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी जाहीर केलं, तेव्हा तिथं प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. आनंद होताच त्यात. पण काहीसं आश्चर्यही होतं. परंतु खरं सांगायचं, तर त्या पाचांपैकी कोणाचंही नाव जाहीर झालं असतं, तरी अशीच प्रतिक्रिया आली असती. तेव्हा आता या निकालाबाबत कोणी बेसूर लावता कामा नये.

सारेगमपच्या अंतीम फेरीच्या निमित्ताने सकाळने सारेगमपच्या पहिल्या पर्वात स्पेशल ज्युरी अवॉर्ड पटकावणारी अनघा ढोमसे हिचा लेख प्रसिद्ध केला होता. त्यात तिने निकालानंतरच्या रितेपणाविषयी लिहिलं आहे. तसाच रितेपणा आता आणखी काही दिवस आपणां प्रेक्षकांनासुद्धा जाणवणार आहे. आपलं काहीतरी हरपलं-हरवलं अशी जाणीव काही दिवस तरी आपणा सगळ्यांनाच छळणार आहे.

का गुंतलो आपण येवढे या कार्यक्रमात?

त्या पाच - पाचच का? खरं तर पहिल्या दहा ता-यांची गायकी अप्रतिम होती, यात शंकाच नाही. शाल्मली किंवा अवंती स्पर्धेबाहेर गेली, तेव्हा अनेकांनी डोळे पुसले होते! तर त्यांच्यातील या अद्भुताने भारावून जाऊन आपण तो कार्यक्रम पाहात होतो. त्यात आश्चर्य होतं आणि कौतुकही. पण एवढंच होतं का? मला वाटतं, या कार्यक्रमात आणखीही काही वेगळं फेव्हिकॉल होतं!

या कार्यक्रमाबाहेरचं जग पाहा. कसा दाट काळोख माजलेला आहे! सर्वांची अवस्था थोड्याफार फरकाने अनुदिन अनुतापे तापलो अशीच आहे. अशा अवस्थेत माणसाला डोळे मिटून मान टाकावी असा एक खांदा लागतो. या खांद्याकडून तशी फार अपेक्षा नसते. म्हणजे अगदी 'मुक्ती चारी' वगैरे काही साधायच्या नसतात आपल्याला. आपल्याला फक्त काही काळ मन रमवायचं असतं. त्यासाठी आपण स्वस्तातली, सहजी मिळणारी रंजनसाधनं वापरतो. सिनेमे, सिरियल्स, टाइमपास बातम्या असं काय काय आपण पाहतो. पण त्यातून मन रमेल याची मात्र खात्री नाही. हे चित्रपट, मालिका म्हणजे तर बिस्किटाच्या कोनातली आईस्क्रिमच. खाऊन संपविली की हमखास तहान लागणार अशी. अशा दुष्काळात हे लिटिल चॅम्प्स टीव्हीवर दाखल झाले. भवताली घनगर्द अंधार असतो, तेव्हा काजवाही महातारा वाटतो. इथं हे लिटिल चॅम्प्स तर अगदी सूर्यासारखे तळपत होते. तो प्रकाश आपणांस प्रचंड दिलासा देणारा वाटला. कारण त्यात हलकं असं काही नव्हतं. सगळं नितळ, निष्पाप होतं. आणि हे केवळ त्या मुलांच्या गायकी वा ते गात असलेल्या गाण्यांपुरतंच मर्यादीत नव्हतं. त्या मुलांकडं पाहताना आपल्या नेणीवेत हे कुठंतरी सारखं असायचं, की अरे, ही मुलं आज अशी गाताहेत, तर मोठी झाल्यावर कशी गातील! नक्कीच, नक्कीच तो 'उद्या' आशादायक आहे! हे आशेचं दान या कार्यक्रमातून आपल्याला मिळत होतं. या जगातील चांगुलपणावरील, निरागसतेवरील आपल्या ढासळत्या श्रद्धांना या मुलांचं अद्भूत गाणं सावरून धरीत होतं. आपण कार्यक्रम पाहात होतो आणि आपल्या मनात एका अबोध पातळीवर हे सर्व व्यवहार सुरु होते. अगदी असंच असणार हे. सारेगमप लिटल् चॅम्प्सचा आपण एवढे इमोशनल वगैरे होऊन जयजयकार करीत होतो, त्याचं कारण किमान याच्या जवळपासच कुठं तरी असणार. मला असं मनापासून वाटतं. तुम्हाला?

वाचकांच्या प्रतिक्रिया