मुंबई - मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या घटनेला एक वर्षे पूर्ण होत असतानाच "सी-लेग' या अत्याधुनिक बोटी मुंबई पोलिस दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. आपत्कालीन स्थितीत जमिनीवरही चालविता येणाऱ्या या बोटी पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांच्या उपस्थितीत उद्या (ता.6) पोलिस दलात सामील होणार आहेत.
सागरीमार्गाने आलेल्या लष्कर ए तैयबाच्या दहा अतिरेक्यांनी गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला केलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईची सागरी सुरक्षा चोख ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचाच भाग म्हणून या बोटी घेण्यात आल्या आहेत. गिरगाव, माहीम, जुहू आणि गोराई येथील चौपाट्यांवर या बोटी तैनात केल्या जाणार आहेत. या बोटीवर एक मास्टर, एक खलाशी आणि दोन पोलिस कर्मचारी शस्त्रास्त्रांसह ठेवले जाणार आहेत. घातपाती कारवाया घडविण्यासाठी मुंबईत शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शत्रूवर कारवाई करण्यासाठी या बोटी वापरल्या जाणार आहेत. याशिवाय बचावकार्य, शोधमोहीम आणि शहरातील पूरस्थितीच्या वेळीदेखील या बोटी वापरता येतील. समुद्रातील संशयास्पद हालचालींवर अहोरात्र नजर ठेवणाऱ्या या बोटी आवश्यकतेनुसार समुद्रात ताशी 75 मैल वेगाने चालविता येतील. या बोटींचा तळ ऍल्युमिनिअमचा असल्याने कोणत्याही स्थितीत या बोटी पाण्यात बुडणार नाहीत अशी हमीच या बोटी तयार करणाऱ्या कंपन्यांनी दिली आहे. या बोटीत अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्यात जीपीएस, ट्रॅकिंग सिस्टिम, समुद्राची खोली मोजण्याचे यंत्र, व्ही.एच.एफ. मरिन रेडिओ तसेच शक्तिशाली सर्चलाईट ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईचा सागरीकिनारा सुरक्षित ठेवण्यास साह्यभूत ठरणाऱ्या या बोटींचा प्रत्यार्पण सोहळा उद्या (ता.6) सकाळी गिरगाव चौपाटी येथे होणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.