पाटणा - राष्ट्रीय पक्ष लहान आणि प्रादेशिक पक्षांना चिरडू पाहत आहेत अशी टीका माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांनी केली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी करण्यात अपयश आल्याचा संदर्भ देत त्यांनी टीका केल्याने त्यांचा रोख कॉंग्रेसकडे असल्याचे स्पष्ट होते.
राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकारिणीची बैठक काल रात्री येथे झाली. त्यावेळी लालूप्रसाद यादव बोलत होते. ते म्हणाले, ""राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांना चिरडू पाहत आहे. बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यांत राष्ट्रीय पक्षांनी या प्रादेशिक पक्षांना अक्षरशः खाऊन टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा प्रयत्नांमुळे माझ्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, बहुजन समाज पक्षाच्या मायावती आदी नेत्यांचा प्रभाव कमी होणार नाही.''
ज्याच्याकडे सत्ता असते त्याचाच आवाज केंद्र ऐकते असे सांगून लालूप्रसाद म्हणाले, "" महाभारत तसेच मोगलांच्या किंवा कोणत्याही काळात पहा ज्यांची सत्ता आहे त्यांचेच दिल्ली ऐकत. केंद्रातील सध्याच्या सरकारवर टीका करताना ते म्हणाले, ""वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांपुढील प्रश्न तसेच आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर कोणताही तोडगा दृष्टिपथात दिसत नाही.
राज्यातील नीतिशकुमार यांचे सरकार दिवस मोजत असून विधानसभा निवडणुकीत आपलीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, सध्या मी केंद्रातील सत्तेत नसल्याने आनंदीच आहे. जर का मी रेल्वेमंत्री असलो असतो तर व्यस्त कार्यक्रमांमुळे मला तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटायची संधी मिळाली नसती.