नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीतील हवाला रॅकेट उद्ध्वस्त केले असून, सहा व्यापाऱ्यांना अटक केली आहे. पन्नास कोटी रुपयांचा हवाला व्यवहार केल्याचा या सहा जणांवर आरोप ठेवण्यात आला आहे.
सहापैकी हरमिश अरोरा, हरीश चौधरी, प्रदीप मंगलीक या तिघांना विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. अन्य तिघांना लवकरच न्यायालयासमोर उभे करण्यात येईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सर्व सहा व्यापारी तयार कपड्यांचा व्यवसाय करतात. आपला परदेशातील व्यापार ते पंचवीस टक्क्यांनी वाढवून दाखवत ते बेकायदेशीररीत्या नफा कमवत होते. या सर्वांनी बोगस कंपन्या स्थापन केल्या होत्या. त्या कंपन्यांचे पत्तेही खोटे होते. या कंपन्यांच्या नावावर त्यांनी बोगस खरेदी व विक्रीचे व्यवहार दाखविले होते. या आरोपींच्या देशातील; तसेच परदेशातील व्यवहारांची आता सखोल तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.