विदर्भ >> बातम्या RSS

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील चर्चा लवकर पूर्ण होणार - प्रफुल्ल पटेल
सकाळ वृत्तसेवा
Thursday, November 05th, 2009 AT 1:11 AM

नागपूर - राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्यासंदर्भात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील चर्चा उद्यापर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर लवकरात लवकर सरकार स्थापन करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज येथे केले.

डेक्‍कन 360 या लॉजिस्टिक एक्‍स्प्रेस सेवेच्या उद्‌घाटनाकरिता ते नागपुरात आले होते. विमानतळावर पत्रकारांशी बातचीत करताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील चर्चेची प्रक्रिया उद्यापर्यंत कोणत्याही स्थितीत पूर्ण होणार आहे. आगामी पाच वर्षांत दोन्ही पक्षांमध्ये योग्यप्रकारे समन्वय असावा, त्याकरिता ही चर्चा महत्त्वाची आहे. आघाडीच्या बाजूने राज्यातील जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे निर्धारित मुदतीच्या आत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ता स्थापन करेल, असे त्यांनी नमूद केले.

मागील दोन आठवड्यांपासून उभय पक्षांमध्ये निव्वळ चर्चा होत आहे. याकडे लक्ष वेधले असता, ते म्हणाले की, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये कालदेखील चर्चा झाली आणि उद्यादेखील होणार आहे. उद्यापर्यंत सर्व मुद्द्यांवर अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता असून, त्यानंतर सरकार स्थापन होणार आहे. यापूर्वी 1999 मध्ये सरकार स्थापनेकरिता 15 दिवस आणि 2004 मध्ये 12 दिवस लागले होते. त्यामुळे पुढील पाच वर्षांतील समन्वयाकरिता काही मुद्द्यांवर चर्चा करणे आवश्‍यक आहे, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना भाजप व सेनेकडून मुख्यमंत्रिपदाकरिता देण्यात आलेल्या कथित ऑफरला प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावले. अजित पवार यांना ना कोणी ऑफर दिली अथवा कोणीही त्यांच्याशी चर्चा केली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदार व नेत्यांनी छगन भुजबळ यांची सर्वानुमते पक्षनेतेपदी निवड केली. त्यामुळे पक्षात कोणताही वाद अथवा विवाद नाही, असे त्यांनी नमूद केले.

वाचकांच्या प्रतिक्रिया

  

On November 05th 4:11 PM, pradip desai said:

i like sakal news paper

 

On November 05th 7:11 AM, Mohan Swadeshi said:

satte aani corruption chi charcha sampat aali aare wah wah...Mothya Politician la cancer zala ki Gutkha band hoto paan deshala Corruption cha cancer zala aahe..paan kahi nahi band hot ..Vichar kara

 
1