मुंबई - जनतेने स्पष्ट कौल देऊनही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी राज्यात सरकार स्थापन करण्यात हलगर्जीपणा दाखवत असल्याने जनमानसात असंतोष धुमसू लागला आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्यातही तीव्र नाराजी उमटू लागली आहे. लोकांमध्ये असंतोष धुमसत असला, तरी दोन्ही पक्षांचे नेते मात्र खातेवाटपाच्या खेचाखेचीत गुंग आहेत.
या जनमताचा आदर करण्यासाठी राज्यपाल एस. सी. जमीर यांनीही पुढाकार घेऊन आज एका पत्रकाद्वारे आघाडीतील पक्षांना लवकरात लवकर सरकार स्थापण्याचे आवाहन केले. राज्यपालांची ही कृती नेहमीच्या शिरस्त्याला धरून नसली, तरी राज्यात उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीची दखल घेण्यासाठी आणि आघाडीच्या नेत्यांची कानउघाडणी करण्यासाठी केली गेली.
जनमताचा दबाव आणि पक्षाची प्रतिमा सावरण्यासाठी कॉंग्रेसने आपल्या मागण्यांना आता केवळ प्रतीकात्मक रूप दिले असल्याने, दोन पक्षांतील हा वाद आता किरकोळ स्वरूपाचा राहिल्याचे गेल्या तीन दिवसांपासून सांगितले जात आहे; मात्र तो "किरकोळ' वाद सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही पक्षांचे नेते आलटून-पालटून मुंबई आणि दिल्लीकडे प्रश्न सोपवत असल्याने; तसेच त्यांचे नेते महाराष्ट्रातील सरकारचा प्रश्न तसाच ठेवून दौरे करत असल्याने, जनतेच्या मनात संतापाची भावना रुजली आहे. नवनिर्वाचित आमदारही अस्वस्थ असून, विजयाची माळ गळ्यात पडून 15 दिवस झाले, तरी शपथ घेण्याची संधी मिळाली नसल्याने ते या परिस्थितीला दोष देऊ लागले आहेत. "आमदार म्हणून कार्ड तरी छापायला द्यावीत की नाही? काही भलते तर होणार नाही ना,' असे प्रश्न नव्या आमदारांच्या तोंडून ऐकू येऊ लागले आहेत. विधानभवनाच्या आवारात केलेली अधिवेशनाची तयारी गुंडाळण्यात आली आहे.
1999 मध्ये सरकार बनविण्यासाठी यापेक्षा अधिक कालावधी लागला होता; 2004 मध्येही आम्ही सरकार बनविण्यास असाच वेळ घेतला होता, या आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सामान्य जनतेच्या प्रतिक्रियांची तीव्रता वाढली आहे. या दोन्ही पक्षांकडून राज्यपालांनी नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी काही ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
-----------
वाटाघाटी अंतिम टप्प्यात
नवी दिल्ली - "सरकार स्थापनेच्या आणि खातेवाटपाच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. उद्या (गुरुवारी) कॉंग्रेसश्रेष्ठींकडून त्याला हिरवा कंदील मिळाला की एक-दोन दिवसांत सरकारचा शपथविधी होईल,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रात्री सांगितले. मुंबईत दिवसभर चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. तीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, आर. आर पाटील, जयंत पाटील, अजित पवार हे सहभागी झाले. बैठकीदरम्यानच प्रफुल्ल पटेल हे कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या निवासस्थानी गेले, तेथे दोन्ही नेत्यांची सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल पुन्हा पवारांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत सहभागी झाले होते.
----------
वाद मिटविण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यानुसार येत्या 48 तासांत नव्या सरकारची स्थापना होईल.
- अशोक चव्हाण, मुख्यमंत्री