उत्तर महाराष्ट्र >> बातम्या RSS

शेतकरी अपघात विमा योजनेकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
Thursday, November 05th, 2009 AT 12:11 AM
जळगाव - शेतकऱ्यांचे अपघातात गंभीर जखमी होणे किंवा मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अलीकडे वाढले असून, त्यांना अथवा त्यांच्या वारसांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी विमा योजना राबविण्याविषयी राजकीय पक्षांमध्ये कोणतीही आस्था दिसून येत नाही, तर जिल्हा बॅंकेत शेतकऱ्यांसाठी जनता अपघात विमा योजना लागू करण्याच्या चर्चेचे गुऱ्हाळ फक्त सुरू असते. प्रत्यक्षात विमा योजना शेतकऱ्यांना लागू करण्याविषयी कृती होताना दिसत नाही. शासनाच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार अपघातात जखमी होणे अथवा मरण पावण्याचे प्रमाण अर्धा टक्का आहे.

शेतीतून अपेक्षेप्रमाणे उत्पन्न न मिळणे, सततचा तोटा या व इतर कारणांमुळे शेतकऱ्यांत वैफल्यग्रस्तता वाढीस लागली आहे. त्यातून शेतकरी आत्महत्येच्या घटना अधूनमधून घडण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. आत्महत्या केलेल्या जिल्ह्यातील 136 शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदतही मिळालेली नाही. ही स्थिती एकीकडे, तर दुसरीकडे अपघातात गंभीर जखमी होणे अथवा मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही अलीकडे वाढल्या आहेत. अपघातग्रस्त शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून जिल्हा बॅंकेने आपल्या शेतकरी सभासदांसाठी चार वर्षांपूर्वी अपघात विमा काढला होता. मात्र नंतरच्या काळात बॅंकेवर प्रशासक मंडळ असल्याने तो काढला गेला नाही. वर्षभरापासून लोकनियुक्त संचालक मंडळ बॅंकेवर कार्यरत आहेत; परंतु त्यांनीही अपघात विमा काढलेला नाही. एकीकडे शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवायचा; प्रत्यक्षात कृती काहीच करायची नाही, असा दृष्टिकोन राजकारण्यांचा अनुभवास येत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारण्यात राजकीय पक्षांची स्पर्धाच चाललेली असते; पण जेव्हा त्यांना लाभ देण्याचा विषय येतो, तेव्हा राजकीय मंडळी मूक भूमिकेत असतात. जिल्हा बॅंकेत तर अपघातासाठी कोणत्या विमा कंपनीची पॉलिसी शेतकऱ्यांसाठी घ्यावी, यावर नुसती चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात काम करावे लागते. त्यामुळे सर्पदंश, विहिरीत पडून अपघात किंवा थेट मृत्यू ओढवल्याच्या घटना अधूनमधून घडत आहेत. अशा वेळी किमान त्यांना अपघात विम्याद्वारे संरक्षण देता येणे शक्‍य आहे.

कृषी विभागाची योजना

काही महिन्यापासून शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी कृषी विभागाकडे राज्य शासनाने सोपविली आहे; परंतु याची शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना नाही. कृषी विभागानेदेखील त्याची प्रसिद्धी केली आहे असे वाटत नाही. शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग अपघात विमा योजना राबवीत आहे, अशी माहिती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कळवायला हवी, तरच ती शेतकऱ्यांपर्यंत पोचेल.
जिल्हा बॅंकेच्या सर्व सभासद शेतकऱ्यांचा अपघाती विमा काढण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार रिलायन्स विमा कंपनीकडून पॉलिसी घेण्याचेही ठरले आहे. विम्याचे हप्ते भरण्यासाठी लागणाऱ्या रकमेची तरतूदही केली गेली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच बॅंक खंबीरपणे उभी आहे.

- संभाजीराव पाटील, कार्यकारी संचालक, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

वाचकांच्या प्रतिक्रिया