मुंबई >> बातम्या RSS

तंबाखूजन्य उत्पादनांवरील चित्रमय इशारे परिणामशून्य
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 04th, 2009 AT 10:11 PM
मुंबई - तंबाखूजन्य उत्पादनांवर छापण्यात येणारे चित्रमय इशारे हे परिणामकारक ठरत नसून सामान्यजनांना ते समजतही नाहीत, असा निष्कर्ष "हेलिस सेखसरिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ' यांनी केलेल्या पाहणीतून पुढे आला आहे. चित्रमय इशारे प्रभावी करण्यासाठी लोकजागृती; तसेच आवश्‍यक माहिती उपलब्ध करून देण्याची गरजही व्यक्‍त करण्यात आली आहे.

31 मे 2009 पासून सर्व तंबाखूजन्य उत्पादनांवरील वैधानिक इशारे चित्रमय करण्यात आले आहेत. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर तंबाखूमुळे आरोग्याची हानी कशी होते, हे दर्शविणारी चित्रे झळकली आहेत. गेल्या पाच महिन्यांमध्ये पाहणी करून; तसेच लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन संस्थेने चित्रमय इशाऱ्यांमुळे नेमका काय परिणाम झाला, याची पाहणी केली. त्यातून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे.

चित्रमय इशारे परिणामकारक नाहीत. बहुतांश पाकिटांच्या 40 टक्‍के कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर ती आहेत, तर अनेक ठिकाणी वास्तविक प्रदर्शनीय भागाच्या केवळ दहा टक्‍के भागांवरच प्रदर्शित झालेली आहेत. याशिवाय चित्राखाली देण्यात येणारे बहुतांश इशारे हे इंग्रजी भाषेत असल्याने ते सर्वसामान्य लोकांना समजत नाहीत; तसेच ते वैज्ञानिक तथ्यांच्या अनुरूपही नाहीत, असे संस्थेला पाहणीअंती दिसून आले.

संस्थेचे संचालक डॉ. पी. सी. गुप्ता यांनी सांगितले, की "चित्रमय इशारे हे कायद्याच्या उल्लंघनापुरतेच मर्यादित राहिले आहेत. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने हा इशारा कशापद्धतीचा असावा याबाबतचा नमुनाही सादर केला होता; मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारने उदासीनता दाखविली. संबंधित व्यक्‍ती मूळ इशाऱ्याचे गांभीर्य लक्षात न घेता आपल्या परीने त्याचा अर्थ लावतात. ही बाब आरोग्याच्यादृष्टीने हानिकारक आहे. सध्या भारत तंबाखू उत्पादनांच्या दिशेने वेगाने दौडत आहे, त्यापासून बचाव करायचा असेल, तर लोकजागृतीसह अन्य उपायांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची गरज आहे'.

वाचकांच्या प्रतिक्रिया