मुंबई - यवतमाळ जिल्ह्यातील वणीजवळील "वेस्टर्न कोल फिल्ड्स'ची खाण खचल्याने चंद्रपूर ते परळी दरम्यानची "महापारेषण'ची 400 केव्हीची वाहिनी बिघडल्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला होणाऱ्या वीजपुरवठ्यात एक हजार मेगावॉटची तूट निर्माण झाली असून त्यामुळे या भागातील भारनियमनात दीड ते दोन तासांनी वाढ झाली आहे. ही पारेषण वाहिनी दुरुस्त होण्यास किमान 24 तासांचा कालावधी लागणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणीजवळील बोरगाव येथे "वेस्टर्न कोल फिल्ड्स'ची खाण आहे. खाणीच्या आत करण्यात आलेल्या स्फोटामुळे खाण अणि आसपासची जमीन खचली. त्यामुळे त्या भागातून जाणारी चंद्रपूर ते परळी ही "महापारेषण'ची 400 केव्ही क्षमतेची वीज वाहिनी वाकली. त्यामुळे या वाहिनीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी चंद्रपूरमधून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारा सरासरी एक हजार मेगावॉटचा वीजपुरवठा खंडित झाला.