देश >> फोटो RSS

कर्नाटकाची चावी सुषमांकडे
सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, November 03rd, 2009 AT 9:11 PM

सुषमा स्वराज

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे नेते अरुण जेटली यांना कर्नाटकातील पेच मिटवता न आल्याने त्यांना दूर करून, पक्षाचा राजस्थानातील गुंता सोडविणाऱ्या लोकसभेतील पक्षाच्या उपनेत्या सुषमा स्वराज यांचा कर्नाटकातील पेच सोडविण्याची सूत्रे सोपविण्यात येणार असल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे स्वराज यांचे पक्ष संघटनेतील वजन आणखी वाढल्याचे मानले जात आहे.

कर्नाटकातील भाजपच्या बंडखोर आमदारांनी माघार घेण्यास आज पुन्हा नकार दिला. त्याच वेळी पक्षाचे नेते लालकृष्ण अडवानी यांनी कर्नाटकाचा पेच सोडविण्यासाठी स्वराज यांना पाचारण केल्याचे संकेत मिळाले आहेत. येडियुरप्पा विरोधात उभे राहिलेले खाणसम्राट रेड्डी बंधू यांच्यापैकी जनार्दन रेड्डी यांनीही "सुषमाजी नन्नपालिगे ताई इदंते,' (सुषमाजी आपल्याला मातेसमान आहेत) असे आज सांगितले. ऐकले तर त्यांचेच ऐकू, असेही त्यांनी सूचित केले.

जनार्दन आणि करुणाकर हे रेड्डी बंधू दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलातून सूत्रे हलवीत आहेत. कालपासून त्यांच्याशी अडवानी, राजनाथसिंह यांनी अनेकदा चर्चा केली. मात्र, त्यांचा हट्ट कायम असल्याचे दिसत आहे. महसूलमंत्री करुणाकर रेड्डी यांनी आज पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा हटाव ही मागणी कायम असल्याचे सांगितले. येडियुरप्पा यांनाच मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्यात येईल, असे वक्तव्य भाजप अध्यक्षांनी केलेले नाही, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, कर्नाटकातील भाजप नेतृत्व हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत असल्याने नेतृत्व बदलाची मागणी आम्ही केली आहे. आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत.

जेटली यांनी आता कर्नाटकाबाबत हात टेकल्याचे चित्र दिसते. आज दिवसभर जेटली यांनी कर्नाटकाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. त्यामुळे अडवानी यांनी आता स्वराज यांनाच कर्नाटकात लक्ष घालण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वराज यांनाच याबाबत विचारले असता त्यांनी स्मितहास्य करीत "देखते है, जो भी होगा देखा जायेगा,' एवढेच उत्तर दिले.

स्वराज यांच्याकडे कर्नाटकची सूत्रे सोपविण्यामागे दोन ठळक कारणे सांगितली जातात. पहिले म्हणजे राजस्थानच्या वसुंधराराजे यांचा राजीनामा घेण्यात त्या यशस्वी ठरल्या. बळ्ळारीतील खाणींमध्ये रेड्डी बंधूंच्या साम्राज्याची पाळेमुळे असल्याचे मानले जाते. स्वराज यांनी काही वर्षांपूर्वी येथूनच कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लोकसभा पोटनिवडणुकीत आव्हान दिले होते. या निवडणुकीत स्वराज यांचे रेड्डी बंधूंशी ऋणानुबंध जुळले ते आजही कायम आहेत.

काय असेल तोडगा?

स्वराज यांनी पेच सोडविण्याबाबत रेड्डी बंधूंशी सकाळी आणि दुपारी अडवानी, राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पुन्हा रेड्डी बंधूंशी चर्चा केली. चर्चेअंती सध्या येडियुरप्पा यांनाच कायम ठेवून काही महिन्यांनी अथवा वर्षाने नेतृत्वबदल करावा, असा तोडगा समोर आल्याचे सांगण्यात आले. मात्र, रेड्डी बंधूंचा त्यावरील प्रतिसाद स्पष्ट झालेला नाही.

वाचकांच्या प्रतिक्रिया