अहमदाबाद - महाराष्ट्रासह देशातील सात राज्यांसाठी डोकेदुखी ठरलेला नक्षलवाद आता गुजरातच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आहे. नक्षलवादी राज्यात कधीही सक्रिय होऊ शकतात, असा इशारा गुप्तहेर संस्थांनी दिला आहे. राज्य सरकार याकडे गांभीर्याने बघत असून, दक्षिण गुजरातमधील नऊ राज्यांतील जंगलांत नाकाबंदी केली जात आहे.
भरूचसह दक्षिण गुजरातमधील नऊ जिल्ह्यांत आदिवासी जमातींची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तेथील काही आदिवासी पाडे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानला लागून असलेल्या जंगल भागात नाकेबंदी केली जात आहे. संशयितांवर विशेष लक्ष ठेवले जात असल्याची माहिती वनमंत्री मंगूबाई पटेल यांनी दिली आहे. दंग जिल्ह्यात नक्षलवादी घुसण्याची शक्यता असून, खबरदारी म्हणून तेथे सहा राज्य राखीव दलाच्या तुकड्यांची मागणी केली आहे. जंगलात बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या, तसेच आदिवासींना भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला अटक केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
राज्यात अजूनपर्यंत नक्षलवादी कारवायांची नोंद झालेली नाही. मात्र, वादग्रस्त प्रलंबित वनजमिनींच्या प्रश्नावरून नक्षलवादी राज्यातील आदिवासींची सहानुभूती मिळवू शकतात. या माध्यमातून ते राज्यात केव्हाही नक्षलवादी सक्रिय होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वनजमिनींचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासींना वनजमिनींचा कायदेशीर ताबा देण्याचा सरकारचा विचार आहे.