विदर्भ >> गडचिरोली RSS

अपुऱ्या पावसामुळे धानपीक धोक्‍यात, शेतकरी हताश
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 01st, 2009 AT 11:11 PM
वैरागड - यावर्षीच्या पावसाळ्यात सुरवातीपासूनच पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे धानपीक धोक्‍यात आले असून, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने शेतीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत करावी, तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात रोहिणी, मृग व आद्रा नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांनी कशीबशी धान पेरणी केली. त्यानंतर पुन्हा रोवणीच्या वेळी पावसाने हुलकावणी दिल्याने रोवणीस विलंब झाला. जमेल त्या साधनाने तलावाचे, विहिरीचे व नदीचे पाणी देऊन रोवणी केली. रोवणी केल्यानंतर पुन्हा पावसाने दगा दिला. प्रत्येक वेळी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला. ऐन बहरण्याच्या वेळी पावसाअभावी निसावलेले धानपीक पूर्णत: करपून गेले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. परंतु, आरमोरी तालुक्‍यात कोणत्याही प्रकारची सिंचनाची सोय नसताना आरमोरी तालुक्‍याला वगळण्यात आले. धानपीक करपले असतानाही अद्याप शेतीचे कोणत्याच प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. यासंदर्भात येथील शेतकऱ्यांनी शेतीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत मिळण्यासाठी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.

वाचकांच्या प्रतिक्रिया