विदर्भ >> बातम्या RSS

पोलिसांच्या आगामी 'ऑपरेशन'मुळे नक्षलग्रस्त भागात दहशत
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 01st, 2009 AT 11:11 PM
लाहेरी/धानोरा - 'सायंकाळी सातच्या सुमाराच आम्ही घराबाहेर पडत नाही संपूर्ण गावच दहशतीत वावरत आहे', अशी प्रतिक्रिया लाहेरीतील ग्रामपंचायत कर्मचारी युवकाने व्यक्त केली, दहशतीचे हे वातावरण केवळ लाहेरीतच नव्हे तर आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हातील संपूर्ण नक्षलग्रस्त भागात आहे. जिल्ह्यातील लाहेरी येथे नुकत्याच घडलेल्या 17 शहीद पोलिसांच्या घटनेनंतर या संपूर्ण नक्षलग्रस्त भागातील गावांत कमालीची दहशत आहे, तर दुसरीकडे नक्षलवाद्यांचा सफाया करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 3 बटालियन (1800जवान), निमलष्करी सैनिक दल, राज्य राखीव पोलिस दल व इतर पोलिस दल आहे. सुमारे तीन वर्षे चालणारे हे "ऑपरेशन' केव्हाही सुरू होऊ शकते, अशी माहिती आहे.

तीन वर्षे चालणाऱ्या या कारवाईचे परिणाम या भागातील नागरिकांना भोगावे लागणार हे स्पष्टच आहे. पोलिस व नक्षलवादी यांच्यादरम्यान चकमकी घडतील आणि रक्तपात होईल. यामुळे येथील आदिवासींत दहशत आहे.

लाहेरीतल विश्‍वनाथ आत्राम हा युवक ग्रामपंचायतचा लेखणिक असून, त्याचा चुलत भाऊ शंकर बुधाजी आत्राम हा पोलिस होता. तो लाहेरीतील नक्षलवाद्यांच्या पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात मरण पावला. लाहेरीच्या घटनेनंतर पोलिसांनी येथील ग्रामस्थांना पोलिसांनी कुठलाही त्रास दिला नसल्याची कबुली देऊन तो म्हणाला, मात्र पोलिसांनी गोपनार, होडरी, लष्कर, मलमगुड्डा, भुसेवाडा आदी परिसारांतील गावातून नागरिकांना पोलिसांनी येथे आणले आणि त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांच्या मारहाणीत भुसेवाडी येथील रामा ओक्‍सा या युवकाच्या पायाची नस तुटली. त्याने हेमलकसा येथील दवाखान्यात उपचार घेतला. छत्तीसगड येथील अबुजमाडची सीमा येथून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असल्याने येथील लोक लाहेरीत कामाच्या शोधात येतात. पोलिसांनी त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगितले. धानोरा तालुक्‍यातील छोटे गाव टवेटोला येथील आदिवासी कोथुराम कुमेटी (35) म्हणाला, नक्षलवाद्यांनी आंदोलनादरम्यान रस्त्यावर मोठी झाडे आडवी करून वाहतूक अडविली होती. पोलिसांनी गावकऱ्यांना झाडे हटविण्यास सांगितले. मात्र नकार देणाऱ्यांना त्यांनी "थर्ड डिग्री' चा वापर करुन मारहाण केली कुमेटीलाही मारहाण केली. या गावातील 23 वर्षीय युवक वासुदेव डोनू बोगामी हा नक्षलवादी चळवळीत सामील झाला होता. मात्र भ्रमनिरास झाल्याने त्याने जिल्हा प्रशासनापुढे शरणागती स्वीकारल्याचे तो म्हणाला. माओवादी आमच्या गावात येतात आम्हाला जेवण आणि आश्रय मागतात. बंदूकधारी नक्षलवाद्यांना नकार देण्यास सहसा कुणी धजावत नाही.

लाहेरी येथील उपसरपंच सुरेश सिडाम म्हणाले, सी- 60 (नक्षलविरोधी कमांडो पथक)चा हेड कॉन्स्टेबल रामा कुरियानी यांच्यावर गावकऱ्यांचा रोष आहे. तो गावात कुणाच्याही घरात घुसतो तू नक्षल समर्थक आहे का? तुझ्या घरी नक्षलवादी आले होते काय? असे म्हणून लोकांना धमकावितो, त्यांना मारहाण करतो. रामा नसता तर लाहेरीची घटना झालीच नसती असेही उपसरपंच म्हणाले. रामाचा भाऊ पदवीधर होता त्याला नक्षलवाद्यांनी ठार केले होते.

पोलिसांनी कारवाई लक्षात घेता माओवाद्यांच्या उत्तर गडचिरोली डिव्हीजनने सरकारच्या कारवाईचा निषेध केला असून, या भागात पोलिस दलाच्या जवानांचा शिरकाव थांबविण्याची मागणी केली आहे. यासंबंधीची पत्रके त्यांनी ठिकठिकाणी वाटली आहे. माओवादी दहशतवादी नसल्याचे पत्रकात म्हटले आहे.

नक्षलविरोधी ऑपरेशनचे प्रभारी आणि गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनोज शर्मा यांच्या मते गडचिरोलीत लालगडसारखी स्थिती उद्‌भवणार नाही आणि अशी स्थिती निर्माण झाली तर आम्ही गावकऱ्यांना समजावू की, माओवाद्यांना साथ देऊ नका, रक्तपात करण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला त्यांचा सफाया करावयाचा आहे आणि त्यांनी जर विरोध केला तर आम्हीही तयारीत आहोत. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रीय दलाचे समन्वयकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयार्फे प्रस्तावित महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांची ही संयुक्त कारवाई नाही.

नक्षलवाद्यांचा उत्तर गडचिरोलीतील मुरूमगाव, धानोरा, पेंढरी, कोरची, कारवाफा तर दक्षिण गडचिरोलीतील छत्तीसगड राज्यातील अबुजमाडच्या सीमेलगतच्या भामरागडचा संपूर्ण भाग सर्वाधिक प्रभावित आहे. येथून नक्षलवादी संरक्षणदेण्याच्या नावाखाली तेंदू ठेकेदार आणि व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी वसूल करतात आणि मध्येच शाळा सोडलेले विद्यार्थी, असमान विकासाअभावी निर्माण झालेल्या परिस्थिमुळे भ्रमित आदिवासी आणि पोलिस तसेच प्रशासनापासून त्रस्त आदिवासींना आपल्या चळवळीत सामील करतात.

लाहेरी पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात झालेला हल्ला हा यावर्षीचा माओवाद्यांचा तिसरा मोठा हल्ला होता. यात 17 पोलिस ठार झाले होते. तत्पूर्वी धानोरा तालुक्‍यातील टवेटोला येथील हत्तीगोटा येथे नक्षलवाद्यांनी 21 मे 2009 रोजी केलेल्या या हल्ल्यात 16 पोलिस ठार झाले होते. यात एक वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक पाच महिला पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश होता. यावर्षी एक फेब्रुवारी रोजी मुरूमगावनजीक झालेल्या हल्ल्यात 15 पोलिस ठार झाले होते, तर यावर्षी जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. जिल्ह्यात मागील सात वर्षांत झालेल्या चार वेगवेगळ्या चकमकीत 52 पोलिस ठार झाले. यापैकी मागील वर्षी सात पोलिस ठार झाले. 2002 ते 2009 च्या दरम्यान गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात 106 पोलिस ठार, तर 200 जखमी झाले, तर दुसरीकडे याच कालावधीत 57 नक्षलवादी ठार झाले.

वाचकांच्या प्रतिक्रिया