विदर्भ >> बातम्या RSS

गावातील आश्रयानंतर भूमिगत नक्षलवादी पुन्हा जंगलात परतले
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 01st, 2009 AT 11:11 PM
गडचिरोली - जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात घातपात घडवून आणण्याच्या हेतूने बाहेरून आलेल्या नक्षलवाद्यांनी कडक सुरक्षा व्यवस्थेची धास्ती घेऊन जंगलाऐवजी नागरिकांची घरे व सार्वजनिक इमारतीचा आश्रय घेतला होता. तसेच, शेकडो नक्षलवादी भूमिगत होऊन साध्या वेशात वावरत होते. आता सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आल्याने ते पुन्हा जंगलात परतले असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी भामरागड तालुक्‍यातील लाहेरी जंगलात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 17 पोलिस शहीद झाले होते. या पार्श्‍वभूमीवर गृह खात्याने जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कडक सुरक्षा लावली होती. छत्तीसगड व आंध्रप्रदेश सीमेसह जंगलात मोठ्या प्रमाणात जवान तैनात होते. यामुळे धास्तावलेल्या नक्षलवाद्यांनी दुर्गम भागातील गावे व तेथील सार्वजनिक ठिकाणी आश्रय घेतला होता. तसेच, साध्या वेशातील नक्षलवादी पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती पुढे आली आहे. नेहमीपेक्षा यावेळी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घातपात घडवून आणण्याच्या हेतूने इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जिल्ह्यात शिरल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिस प्रशासनाने नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढविली होती.

सीआरपीएफ व एसआरपीचे सशस्त्र जवान जंगलात तैनात करण्यात आल्याची माहिती मिळताच नक्षलवाद्यांनी आपल्या सुरक्षेसाठी नागरिकांच्या घराचा आश्रय घेतला. एवढेच नाही, तर अतिदुर्गम गावांमध्ये घरेच नाही, तर गोठे व सार्वजनिक इमारतीही त्यांना अपुऱ्या पडल्या होत्या. शेकडो नक्षलवादी भूमिगत झाले होते. साधा वेशातील हे नक्षलवादी पोलिस व निवडणुकीच्या हालचालीची माहिती आपल्या वरिष्ठांना देऊन त्याप्रमाणे नियोजन करीत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच नागरिकांच्या घरात आश्रय घेतलेले व भूमिगत झालेले नक्षलवादी पुन्हा जंगलात परतले असून, आपापल्या क्षेत्रात त्यांची आगेकूच सुरू झाली आहे. कोटमी, ताडगाव, मालेवाडा व कोरची तालुक्‍यांत नक्षलवादी-पोलिसात चकमकी झाल्या. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाईच्या धास्तीने प्रशासनाने ऐनवेळी अनेक मतदान केंद्र हलविले होते. जिल्ह्यात पहिल्यांदाच काही मतदान केंद्रावरील निवडणूक स्थगित करण्याइतपत परिस्थिती आली. सुदैवाने मोठ्या घटना घडल्या नाहीत. प्रशासनाच्या प्रयत्नाने दुर्गम भागातही मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

नक्षलवाद्यांचे काम फत्ते.........

नक्षलग्रस्त दुर्गम भागात पोलिसांच्या कडक सुरक्षेमुळे घातपाती कारवाया करण्यासाठी नक्षलवाद्यांनी निवडणुकीपूर्वीच व्यूहरचना आखली होती. त्यानुसार त्यांनी तालुका मुख्यालयापासून जवळ असलेल्या काही गावांमध्ये आश्रय घेतला होता. त्यामुळे चौकस सुरक्षा असतानाही नक्षलवादी पोलिसांच्या जाळ्यात अडकले नाहीत. नक्षलवाद्यांची ही नवीन युक्ती मात्र नागरिकांसाठी चांगलीच त्रासदायक ठरली.

वाचकांच्या प्रतिक्रिया