विदर्भ >> बातम्या RSS

मराठा साहित्यच खरे मराठी साहित्य - प्रा. जैमिनी कडू
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 31st, 2009 AT 11:10 PM
नागपूर - मराठा साहित्यच खरे मराठी साहित्य असून समताधिष्ठित समाज, शोषणमुक्त सामान्य माणूस हे मराठा साहित्याचे सौंदर्यशास्त्र आहे, असे मत सहाव्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. जैमिनी कडू यांनी आज 'सकाळ' जवळ व्यक्त केले.

जळगाव खानदेश येथे शनिवारपासून सहावे मराठा साहित्य संमेलन सुरू झाले. या संमेलनासंदर्भात अध्यक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रा. कडू यांच्याशी संवाद साधला.

मराठा साहित्य एका समाजापुरतेच आहे, असे वाटत नाही का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, "मराठा जातीवाचक शब्द नसून तो भाषावाचक, प्रांतवाचक आहे. भाषा हा शब्द स्त्रीलिंगी आहे. यामुळेच मराठी असो वा बिहारी, मल्याळी भाषेला स्त्रीलिंगी उच्चारातून संबोधले जाते. यामुळे मराठा भाषा असे न म्हणता, मराठी भाषा असे संबोधन होते. मराठी साहित्य हेच बहुजन साहित्य आहे. बहुजन साहित्य म्हणजे मराठा साहित्य आहे. मराठा वर्ग नाही, तो बहुजन आहे. मराठा जसा बहुजन आहे, तसेच साहित्यही आहे. या साहित्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. ती लुप्त आहे. त्याला नवी ओळख द्यायची आहे. यामुळे मराठा साहित्याच्या अस्तित्वासाठीचा हा लढा आहे.'

मराठा साहित्याचे सौंदर्यशास्त्र कसे स्पष्ट करता येईल, या प्रश्‍नावर ते उत्तरले, "आपण ज्या साहित्याला मराठी साहित्य संबोधतो, ते संस्कृती व्यवस्थेने निर्माण केलेले आहे. ते अभिजनवादी साहित्य आहे. ते ध्येयाने बंदिस्त आहे. केवळ कल्पनाविलास हेच त्या साहित्याचे सौंदर्यशास्त्र आहे. परंतु, मराठा साहित्यच खरे मराठी साहित्य असून समताधिष्ठित समाज, शोषणमुक्त सामान्य माणूस हे मराठा साहित्याचे सौंदर्यशास्त्र आहे. या अभिजन संस्कृतीने व्यवसायानुसार सामाजिक स्तरावर विभागणी केली. यामुळे बहुजन साहित्यिक घटक जातीनिहाय वेगळा झाला. बहुजन माणूस चालताबोलता कविता करतो, तो ठरवून लिहीत नाही. बहिणाबाईंनी ठरवून लिहिले नाही. मराठा साहित्य आणि अभिजनवादी साहित्य यांच्यात सांस्कृतिक संघर्ष आहे, असेही म्हणता येईल.'

मराठा साहित्य ही वेगळी चूल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बहुजन साहित्यातील हजारो वर्षांच्या परंपरेतील विखुरलेल्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न मराठा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. यामुळे झाडीपट्टीतील साहित्य असो, दलित साहित्य, नवसाहित्य असो की प्रबोधन साहित्य; या सर्व साहित्य प्रवाहांचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून या साहित्य प्रवाहाला मराठा साहित्याच्या प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

समतेची स्थापना हे मराठा साहित्याचे मूलगामी सूत्र आहे. या साहित्याची प्रेरणा प्राचीन आहे. चार्वाक, बुद्धापासून, संत तुकाराम असो की संत चोखामेळा, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मातेपासून तर आधुनिक काळात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे सूत्र घेऊन मराठा साहित्याची वाटचाल असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचकांच्या प्रतिक्रिया