पश्चिम महाराष्ट्र >> बातम्या RSS

प्रश्‍न सोडविण्यासाठी विठुराया शक्ती, बुद्धी दे
सकाळ वृत्तसेवा
Thursday, October 29th, 2009 AT 11:10 PM

पंढरपूर - कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व त्यांच्या पत्नी मीना भुजबळ यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे करण्यात आली. त्याप्रसंगी वारकरी प्रतिनिधी प्रमिला आणि त्यांचे पती बाळू दत्तू भोसले.

पंढरपूर - विठुराया, यापुढच्या काळात देखील महाराष्ट्राची वेगाने प्रगती व्हावी. सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शक्ती आणि बुद्धी दे अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

दरम्यान आज कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीत स्नान करून दिंड्या पताकांसह हरिनामाचा जयघोष करीत नगरप्रदक्षिणा केली. टाळ मृदंगाच्या गजरामुळे अवघी पंढरी दुमदुमून गेली होती.

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा श्री.भुजबळ यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. यावेळी त्यांचे पुत्र, आमदार पंकज भुजबळ, पुतणे खासदार समीर भुजबळ व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. काल सायंकाळी श्री.भुजबळ हे आपल्या कुटुंबीयांसह येथे आले. आज पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि नंतर श्री रुक्‍मिणीमातेची त्यांच्या हस्ते यथासांग पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष ऍड.शशिकांत पागे यांनी श्री.भुजबळ यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.

श्री.भुजबळ म्हणाले, ""पंढरपूरचे श्री विठ्ठल-रखुमाई हे देशाचे आराध्य दैवत आहे. पंढरपूर येथे दरवर्षी लाखो वारकरी येत असतात. या वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी श्री संत तुकाराम महाराज चतुःजन्मशताब्दीच्या निमित्ताने शासनाने मंजूर केलेल्या निधीतून वेळेत कामे पूर्ण करण्यात येतील. पंढरपूर आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापनाही केली आहे. त्यामुळे या परिसराचा विकास होईल.'' पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल असे सांगून ते म्हणाले, ""राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य, वीज, पाणी, महागाई आणि बेरोजगारांच्या समस्या सुटाव्यात, सामान्य जनतेचे धोरण ठरविण्याचे काम विधानसभेचे सदस्य करतात. त्यांना युक्ती आणि शक्ती देऊन चांगले काम घडावे असे साकडे आपण आज घातले आहे.''

वनमंत्री श्री.पाचपुते म्हणाले, ""पंढरपूर ही जगातील अध्यात्मनगरी व्हावी. भावभक्तीचा प्रवाह या ठिकाणी सतत वाहतो. भक्तीचा मळा फुलविण्याचे काम वारकरी करतात. या अध्यात्मनगरीत भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.''

वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळालेले बाळू भोसले आणि त्यांच्या पत्नी प्रमिला भोसले हे गेली पंचवीस वर्षे पंढरीची वारी करीत आहेत. भोसले हे भांड्याचे व्यापारी आहेत. विठ्ठलाच्या दर्शनामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळते. आज विठ्ठलाच्या महापूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळाल्याबद्दल अतिशय आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

वारकरी प्रतिनिधी बाळू दत्तू भोसले आणि त्यांच्या पत्नी प्रमिला भोसले यांना एसटी महामंडळाच्या वतीने एक वर्षाचा मोफत प्रवासाचा पास श्री.भुजबळ यांच्या हस्ते आणि एसटी महामंडळाचे पुण्याचे प्रादेशिक व्यवस्थापक आर.सी.पाटील, विभाग नियंत्रक डी. बी. माने, वरिष्ठ आगारप्रमुख श्री.हांडे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

यावेळी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उल्हास पवार, आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ.जगदीश पाटील, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य बाळासाहेब बडवे, प्रा.जयवंत भंडारे, कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांनी नदीत स्नान करून मोठ्या भक्तिभावाने नगरप्रदक्षिणा केली. परंपरेप्रमाणे दुपारी रथयात्रेचा सोहळा देखील उत्साहात पार पडला.

कर्नाटकच्या वारकऱ्यास पूजेचा मान

कार्तिकी एकादशीनिमित्तच्या शासकीय महापुजेसाठी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित राहण्याचा मान कर्नाटकातील बाळू दत्तू भोसले (वय 49, रा. गोकाक जि. बेळगाव) आणि त्यांची पत्नी प्रमिला भोसले या वारकरी दांपत्यास मिळाला.

वाचकांच्या प्रतिक्रिया