मुंबई : जागतिक बाजाराचा नकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावर सोमवारी पडला. त्यामुळे निर्देशांक १०४ अंशांनी घसरून १३ हजार ४०० अंशांवर बंद झाला. सलग चौथ्या सत्रात बाजारात घट झाली असून, निर्देशांक दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे.
आशियाई बाजाराची सुरवात मंदीसदृश झाल्याने मुंबई शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच निर्देशांक काही मिनिटांत ९८.७२ अंशांनी घसरून १३ हजार ४०५ अंशांवर आला. परकी गुंतवणूकदार संस्था आणि म्युच्युअल फंडांनी शेअरची विक्री करण्यावर भर दिला. बाजाराला चालना देणाऱ्या बातम्यांचा अभाव असल्याने खरेदीस चालना फारशी मिळाली नाही. कंपन्यांचे तिमाही निकाल लागण्यास सुरवात झाली असून, अर्थव्यवस्था सावरण्याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न आहेत. याचाही परिणाम गुंतवणूकदारांवर झाला. दुपारच्या सत्रात विक्रीचा दबाव वाढल्याने सत्रांतर्गत व्यवहारात निर्देशांक १३ हजार २१९ अंशांच्या दिवसातील नीचांकी पातळीवर आला होता. मात्र, दिवसातील नीचांकी पातळीवर खरेदीस दलालांनी त्यांच्या पोझिशन्स कव्हर केल्याने आणि स्थानिक गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याने सत्रांतर्गत व्यवहारात निर्देशांकाने १३,४६१.६८ अंशांची दिवसातील उच्चांकी पातळी गाठली होती.
जुलैमध्ये परकी गुंतवणूकदार संस्थांनी ४०३७ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. राष्ट्रीय शेअर निर्देशांक २९.८५ अंशांनी घसरून ३९७४ अंशांवर बंद झाला. विक्रीच्या तडाख्यामुळे कॅपिटल गुड्स, धातू आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील शेअर घसरले. मात्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअरला मागणी असल्याने निर्देशांकात मोठी घट झाली नाही. इन्फोसिस, विप्रो, टीसीएस हे शेअर वधारले. रिलायन्स इन्फ्रा (६.१० टक्के), टाटा स्टील (४.१० टक्के), मारुती सुझुकी (३.३८ टक्के), हिंदाल्को (३.३५ टक्के), डीएलएफ (३.३४ टक्के) आणि जयप्रकाश असोसिएट्स (४.८३ टक्के), हे शेअर घसरले.