महाराष्ट्र >> बातम्या RSS

साहित्य महामंडळाची बैठक निर्णयांविना
सकाळ वृत्तसेवा
Monday, June 22nd, 2009 AT 8:06 PM
पुणे - धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट असल्याची सबब पुढे करून कोणत्याही विषयावर ठोस निर्णय न घेता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बहुचर्चित ठरलेली बैठक सोमवारी आटोपती घेण्यात आली. त्यामुळे डॉ. आनंद यादव यांच्या राजीनाम्याविषयीचा निर्णय, संमेलनाध्यक्ष निवडणुकीच्या नियमावलीत बदल करण्यासंदर्भातील मुंबई साहित्य संघाचे पत्र, विश्‍व साहित्य संमेलनाची नियमावली, ८३ व्या संमेलनाचे स्थळ आणि विदर्भ साहित्य संघाकडे महामंडळ असताना झालेले आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप... असे बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवरील अनेक प्रश्‍न अनुत्तरितच राहिल्याची चर्चा साहित्य वर्तुळात होती. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मात्र "बैठक स्थगित करण्यात आली,' असे पत्रकार परिषदेत सांगितले.

महामंडळाच्या या बैठकीच्या वैधतेविषयी शंका उपस्थित करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाचे मनोहर म्हैसाळकर, नरेंद्र लांजेवार, श्रीपाद जोशी यापैकी एकही प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित नव्हता. ठाले पाटील यांनी बैठकीविषयीचे निवेदन पत्रकारांना दिले. त्यामध्ये "धर्मादाय आयुक्तांकडे चौकशीसाठी असलेल्या महामंडळाच्या प्रकरणाची माहिती मी (ठाले पाटील यांनी) बैठकीत दिली. महामंडळाचे कार्यालय विदर्भ साहित्य संघाकडे असताना हिशेबात झालेल्या गैरव्यवहाराचे प्रकरणही या चौकशीत आहे. हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे चौकशीसाठी असल्यामुळे धर्मादाय आयुक्तांची रीतसर परवानगी घेऊनच बैठकीतील नियोजित कामकाज करावे, असे एकमताने ठरविण्यात आले आणि बैठक स्थगित करण्यात आली,' असे ठाले पाटील यांनी म्हटले आहे.

या बैठकीला अरुण प्रभुणे, कुंडलिक अतकरे, डॉ. वि. भा. देशपांडे, मिलिंद जोशी, मधू नेने, डॉ. बाळ भालेराव, उषा तांबे, सुहासिनी कीर्तिकर, डॉ. विद्या देवधर, वनिता ठाकूर, सुरेश नाईक, जे. एन. कदम हे सदस्य उपस्थित होते.

"संमेलनाध्यक्षपद यादवांनाच द्यावे'

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आगामी ८३ व्या संमेलनाध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नये, अशी मागणी नगर येथील प्रसिद्ध लेखक प्रा. जवाहर मुथा यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. या संमेलनाचे अध्यक्षपद आनंद यादव यांना द्यावे, असेही ते म्हणाले.

""महाबळेश्‍वर येथील ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षाविनाच झाले आहे. घटनेत तरतूद नसतानाही यादव यांनी संमेलनापूर्वी राजीनामा दिला असून, तो योग्य नाही. संमेलनासाठी नवा अध्यक्ष निवडण्याची तरतूद असतानाही तसे झाले नाही. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत यादव निवडून आल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले पाहिजे, तशी तरतूद आहे,'' असेही मुथा यांनी सांगितले.

वाचकांच्या प्रतिक्रिया