पुणे - साहित्याच्या क्षेत्रातील समीक्षा सध्याच्या काळात आशयाच्या गाभ्यापर्यंत पोचण्यास कमी पडते आहे. मात्र कथा, कविता, कादंबरी, नाटक, ललित लेखन या पारंपरिक आकृतिबंधांच्या पलीकडे जाणारे नवे साहित्य मोठ्या संख्येने निर्माण होत आहे. त्यांची यथार्थ समीक्षा होणेही गरजेचे आहे, असा सूर विविध साहित्यप्रकारांच्या समीक्षकांनी रविवारी लावला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त "संकल्पना आणि समीक्षा' हा मध्यवर्ती विषय ठेवून कथा, कादंबरी, कविता आणि नाटक यावरील निबंधवाचन आणि चर्चेचे आयोजन साहित्य परिषदेत करण्यात आले होते.
"कादंबरी'विषयी बोलताना डॉ. किशोर सानप म्हणाले, ""कादंबरी ही ज्ञानशाखा असून, अनेक सामाजिक आणि शास्त्रीय विषयांचाही तिच्या रचनेशी संबंध असतो. कादंबरीकाराची स्वतंत्र नैतिकता आणि मूल्यविचार असतो. का. बा. मराठे, इतिहासाचार्य राजवाडे आणि भालचंद्र नेमाडे यांनी मराठी कादंबरीची परखड आणि कठोर मीमांसा केली आहे. कादंबरीचे सामाजिक रूप समाजाच्या वास्तवातून जसे घडत जाते, तसे ऐतिहासिक वा पौराणिक अशा भूतकालीन आशयनिष्ठाही त्यात असतात आणि त्यांची अभिव्यक्तीही कृतिप्रधानच असते. समाजाच्या परिवर्तनाची चाहूल लागणे, त्याबद्दलची दिशा मांडणे, उद्याच्या पिढीचे परिप्रेक्ष्य आजच दाखवणे हे केवळ द्रष्टा, प्रतिभावंत, प्रज्ञावंत कादंबरीकारच करू शकतो आणि अशी श्रेष्ठ कादंबरी मराठीत तरी अजून निर्माण झालेली नाही.''
डॉ. आनंद यादव यांनी अध्यक्षीय समारोप केला.
कवितेविषयी दिलीप धोंगडे आणि चंद्रकांत पाटील यांनी विचार मांडले. विलास सारंग यांची "जगणंबिगणं' आणि पु. शि. रेगे यांची "त्रिधा राधा' यांची उदाहरणे देत ते म्हणाले, ""लय, ताल, नाद, प्रतिमा, प्रतीके, रूपके, लक्षणे या संकेतांचे सूक्ष्म वाचन केल्यास कविता आणि तिची समीक्षाही कळते.''
कथेविषयी डॉ. भारती निरगुडकर आणि डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी विवेचन केले. डॉ. निरगुडकर म्हणाल्या, ""आधुनिक कथेचे आरंभापासून ते १९४५ पर्यंत, त्यानंतर १९४५ ते १९८०, १९८० च्या पुढे, असे तीन भाग पडतात. प्रारंभीच्या कथा भारतीय रस, अलंकारशास्त्र आणि शॉर्ट स्टोरी या पाश्चात्त्य संकल्पनेवर बेतलेल्या होत्या. पुढच्या काळात आविष्कारवादी, कलावादी आणि अँग्लो-अमेरिकन; तसेच मर्ढेकरांच्या रूपवादी विचारांवर आधारित कथा दिसते. आधुनिक कथा समाज व मानसशास्त्रीय आदिबंधात्मक मांडणीची आहे.''
श्री. दा. पानवलकर यांच्या "भूमी' या कथेच्या अनुषंगाने निरगुडकर यांनी निबंधवाचन केले.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, ""कलाकृतीची निर्मिती आणि आस्वाद "प्रातिभ' असतो. अभ्यास विषयातील पूर्णता शोधणे महत्त्वाचे असते. अनुभवाच्या समग्रतेतून आशयबंध बोलत असतो. साहित्यकृतीसंदर्भात आस्वादकासाठी मूळ कलाकृतीपासूनचे "सौंदर्यात्मक अंतर' (एस्थॅटिक डिस्टन्स) महत्त्वाचे असते. या दृष्टीने जी. ए. कुलकर्णी, पु. शि. रेगे, पु. भा. भावे आणि मेघना पेठे यांचे लेखन लक्षणीय आहे.''
"नाटका'विषयी डॉ. अजय जोशी यांनी निबंधवाचन केले. """संहिता समीक्षा' आणि "सादरीकरणाची समीक्षा' अशा दोन्ही अंगांनी विचार होणे आवश्यक आहे. रंगभूमीशी संबंधित इतर घटकही त्याला अवगत असावेत. नाटक पाहावे कसे, याविषयी कार्यशाळा घ्याव्यात. चित्रपटाप्रमाणे थिएटर ऍप्रिसिएशन कोर्स असावा,'' असेही त्यांनी सुचविले.
डॉ. वि. भा. देशपांडे म्हणाले, ""समीक्षकाला साहित्य, रंगभूमी आणि माध्यमांचे भान हवे. एकाच वेळी रंगभूमीची परंपरा आणि नवता यांचा एकत्रित विचार त्याला करता आला पाहिजे. त्यातून स्वतःची भूमिका तयार करून त्याला मांडता आली पाहिजे.''