"शिल्पकार चरित्रकोशा'च्या पहिल्या खंडाचे पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
पुणे - ' आपल्याच माणसांमुळे आपण गर्तेत गेलो असून, महाराष्ट्राची मोडतोड करून तीन - चारशे वर्ष महाराष्ट्राचे नुकसान करणाऱ्यांचाही इतिहास लिहिला पाहिजे,'' असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
"साप्ताहिक विवेक'तर्फे महाराष्ट्राची जडणघडण उलगडणाऱ्या "शिल्पकार चरित्रकोशा'च्या पहिल्या खंडाचे पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या प्रसंगी गो. बं. देगलूरकर, डॉ. रामचंद्र मोरवंचीकर, रवींद्र वंजारवाडकर, प्रा. दिलीप करंबेळकर, अजित मराठे, सतीश गानू, गजेंद्र पवार आदी उपस्थित होते. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या कृष्णा पाटील हिचा सत्कार पुरंदरे यांच्या हस्ते झाला. पाटील हिच्या हस्ते "महाराष्ट्र नायक डॉट कॉम' या संकेतस्थळाचे प्रकाशन या वेळी झाले.
शिवनेरी किल्ल्यावरील इमारती इंग्रजांनी पाडल्याची माहिती देत पुरंदरे म्हणाले, ""गेली चारशे वर्ष महाराष्ट्राची मोडतोड झाली. या काळात मोठे नुकसान झाले. ते नुकसान करणारे हात आपलेच होते. त्यामुळेच महाराष्ट्र गर्तेत गेला. तो इतिहास समोर आणल्याने चुका कळतील आणि पुढची पावले योग्य पडतील.'' नाना फडणवीस यांच्याविषयी ब्रिटिशांनी केलेल्या लेखनाचा संदर्भ देत पुरंदरे म्हणाले, ""ब्रिटिशांनी त्यांना हवा तसा इतिहास लिहिला. त्यांनी मनाच्या रोगाची बीजेच यातून पेरली आहेत. कोणताही आजार झाला तरी चालेल; पण मनाचा रोग होता कामा नये.''
इतिहासाने दिलेले धडे गिरवले नाही तर इतिहास हाच आपल्याला धडा शिकवितो, असे नमूद करीत देगलूरकर म्हणाले, ""पाश्चिमात्यांनी विकृत स्वरूपात आपला इतिहास मांडला आहे. तो शुद्ध स्वरूपात मांडला तरच इतिहासाविषयी गोडी निर्माण होईल, त्यातून प्रेरणा मिळून पुन्हा सुवर्ण काळ येईल.''