अमरावती - येथील क्रांती महाजन लिखित 'सुभाष सिक्रेट' पुस्तकातील वादग्रस्त मजकुरामुळे प्रकाशन समारंभाच्या ठिकाणी संतप्त नागरिकांनी रविवारी (ता. 14) तोडफोड केली. चोरूनलपून प्रकाशन केल्यानंतरही येथे तणाव निर्माण झाला होता.
संतप्त नागरिकांनी दोन दिवसांपूर्वीच प्रकाशन समारंभ उधळून लावण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी येथील टाऊन हॉलमध्ये प्रकाशन समारंभाची अनुमती नाकारली. चोरूनलपून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ठराविक लोकांच्या उपस्थितीत कॅप्टन किरडे यांच्या हस्ते 'सुभाष सिक्रेट' पुस्तकाचे प्रकाशन तिरुमला हॉटेलच्या लॉनवर झाले. आभारप्रदर्शन संपल्यानंतर स्वतंत्रसेनानी माणिकराव मोरे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस, विश्वहिंदुपरिषद, बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी खुर्चांची तोडफोड केली. त्यामुळे आयोजकांनी तिरुमला हॉटेलच्या लॉनवरून तडकाफडकी पळ काढला. प्रचंड घोषणाबाजी केल्याने वातावरण अधिकच तापले होते. त्यामुळे सुरक्षेकरिता अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
कॅप्टन किरडेंना ताब्यात घेतले
'सुभाष सिक्रेट' पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित कॅप्टन किरडे आणि लेखक क्रांती महाजन या दोघांनाही अटक करा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केल्यावर पोलिसांनी कॅप्टन किरडेंना ताब्यात घेतले, तर श्रीमती महाजन यांच्या अटकेचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.