पुणे - "माझा रोल कुणीतरी दुसरा माणूस करतोय, हे मला खरंतर नको वाटत होतं...पण, सुनील तू मस्तच "अजय भट्ट' उभा केला आहेस...!', ही प्रतिक्रिया आहे, "इंटेल' कंपनीच्या सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या जाहिरातीतील खऱ्याखुऱ्या अजय भट्ट यांची.
अमेरिकेत स्थायिक असेलेले मराठी उद्योजक आणि अभिनेते सुनील नारकर यांना अजय यांनी आपली प्रतिक्रिया आवर्जून कळविली. "इंटेल'च्या जाहिरातीत दिसणारे अजय भट्ट म्हणजे सुनील. वास्तवातील अजय यांनी सुनीलला फोन करून सांगितले, की "माझा रोल कुणीतरी दुसरा करतोय, याची भीतीही होती. पण, खूप बरं वाटलं. तू माझ्या रोलला खूपच छान न्याय दिला आहेस. तुझे आभार!'
अजय भट्ट यांच्या पत्नीनेही सुनील यांना चांगल्या रोलबद्दल धन्यवाद दिले. "ई सकाळ'शी बोलताना सुनील म्हणाले, "भट्ट कुटुंबीयांनी दिलेल्या शुभेच्छा आणि धन्यवाद हे माझ्यासाठी खूप मोठे बक्षीस आहे. त्यांची भूमिका मी जाहिरातीत साकारली आणि त्यांना ती आवडली, यात सर्व काही आले...'
"इंटेल' कंपनीच्या या जाहिरातीत सुनीलने ज्यांची भूमिका साकारलीय, ते अजय भट्ट म्हणजे "इंटेल'मध्ये वरच्या पदाला पोचलेलं भारतीय व्यक्तिमत्त्व. अजय यांची दुसरी ओळख म्हणजे सध्या सर्वत्र यूएसबी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गॅजेटचे ते सहनिर्माते. अजय यांनी अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण गुजरातमधील बडोदा येथे पूर्ण केले. १९८० मध्ये बडोदास्थित एम. एस. विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९८४ मध्ये न्यूयॉर्कमधील सिटी विद्यापीठातून उच्च पदवी मिळविली. संगणक क्षेत्रात त्यांचे मोठे संशोधन आहे. सध्या त्यांच्या नावावर नऊ अमेरिकी पेटंट आहेत. १९९८, २००३ आणि २००४ या वर्षांत त्यांना अमेरिका आणि आशियातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविले होते.
जाहिरातीचा यूट्यूबवरील व्हिडिओ पाहा.