एक काळ असा होता, की साध्या टेलिफोनसाठी मोठी प्रतीक्षा यादी असायची. नाव नोंदविल्यानंतर काही वर्षांनी फोनची जोडणी होत असे. आमच्याकडे फोन आला असं फार अभिमानाने सांगितलं जायचं. तो एक प्रकारचा "स्टेट्स सिम्बॉल' असे. अगदी सुरुवातीला तर फोन करण्यास व आलेला फोन घेण्यास पोस्टात जावे लागे.
गेल्या काही वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. तसं पाहिलं तर भारतात अनेक क्षेत्रांत क्रांती घडून आली असं म्हणावं लागेल. पूर्वी आमच्याकडे २-३ मेकच्या कार असायच्या. मारुतीनंतर या उद्योगात अनेक कंपन्या उतरल्या. आता भारतात उपलब्ध असलेली मॉडेल्स शेकड्यात मोजावी लागतील. मोठं डोमेस्टिक मार्केट त्यांना मिळालं आहे. जी गोष्ट ऑटोमोबाईलच्या बाबतीत घडली तीच माहिती व दळणवळण क्षेत्रातही दिसून येत आहे.
तुम्हाला फोन हवाय! अनेक कंपन्या, अनेक सुविधा व हे सारं काही ताबडतोब. अगदी एक दिवसातही. साधारणपणे १२-१४ वर्षांपूर्वी भारतात मोबाईल फोन प्रथम आला. सुरुवातीला फार कमी व्यक्तींकडे हा फोन असे. किंमतही परवडणारी नव्हती. मला आठवतंय १०-१२ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल.
मी एका लग्न समारंभासाठी गेलो होतो. तेथे मी विचारलं अमुकतमुक एक आलाय का? मला सांगण्यात आलं, त्या तिथे बाहेरच्या बाजूला पाहा. मोबाईलवर बोलत बसलाय तो. त्या मोठ्या मंडपात त्याच्या एकट्याकडेच मोबाईल होता. आता एका घरातच आई, बाबा, मुलगा, मुलगी असा प्रत्येकाकडे मोबाईल असतो. फार कशाला, तुमच्याकडे कामाला येणाऱ्या मोलकरणीकडे, गड्याकडे मोबाईल असतो.
ट्रेन, बसमध्ये प्रवास करताना तुम्हाला सतत मोबाईल वाजताना आढळतील. अगोदरच आम्हाला "टू द पॉईंट' बोलण्याची सवय नाही. फोनवरही आम्ही एरवी मस्त गप्पा मारत असतो. वेळेची शिस्त पाळण्याची आम्हाला सवय नाही. कामाच्या वेळेत गप्पा मारू नये (फोनवरसुद्धा) ही शिकवण आम्हा भारतीयांना नाही.
आमच्या या सवयीमुळे मोबाईलचे जसे फायदे तसेच तोटेही आहेत, हे आमच्या लक्षात येत नाही, मात्र या क्रांतीचा फायदा मोबाईल कंपन्यांना झालाय. भारतातील मोठी बाजारपेठ त्यांना मिळाली. छोटी-मोठी प्रलोभने दाखवून त्यांनी ही बाजारपेठ काबीज केली आहे. आमच्यामुळे या कंपन्यांची भरभराट झाली. त्यांना प्रचंड नफा मिळाला. वाईट एवढेच वाटते, की भारतात आपण काहीही खपवू शकतो, लोकांना लुबाडू शकतो, ही भावना त्यांच्यात बळावू लागली आहे. त्यामुळेच कित्येक वेळेला "आऊटडेटेड' वस्तू आमच्या बाजारपेठेत "डम्प' केल्या जातात व आम्ही त्या घेतोही.
सुरुवातीला मोबाईल साधे होते. आता त्यात सुविधा मिळू शकतात. कित्येक फोन नंबर स्टोअर करता येतात. गाणी रेकॉर्ड करता येतात व फोटोही काढता येतात. योग्य उपयोग केला तर हे चांगलेच आहे. माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहेत. ते ऑफिसमध्ये असताना एक माणूस त्यांच्या घरी येतो. मुलीला सांगतो, तुझ्या बाबांना मोठा प्रॉब्लेम झालाय. ५० हजार रुपये त्यांनी ताबडतोब मागितले आहेत. ऑफिसमध्ये फोन करू नकोस. तेथे "ऍन्टी-करप्शन'ची लोकं आली आहेत. मुलीने पैसे दिले, पण हे सगळं घडत असताना तिने त्या माणसाचा फोटो घेतला. संध्याकाळी बाबा घरी आल्यावर त्यांनी सांगितले, की मी असे कुणालाही घरी पाठविले नव्हते. फसगत झाल्याचे लक्षात आले, पण मुलीने मोबाईलवर फोटो घेतल्याने पोलिसांना गुन्हेगाराला पकडणे फार सोपे गेले, परंतु या सुविधांचा दुरुपयोगही होतो.
तरुणींचे नकळत फोटो घेणे, कधी कधी त्यांना कल्पना नसताना विशिष्ट पोझेसमध्ये फोटो घेणे, "कॉम्प्रोमायझिंग पोझिशन'मध्ये ते घेऊन नंतर ब्लॅकमेल करणे इत्यादी प्रकार घडत असतात. दुचाकी किंवा गाडी चालविताना फोनवर बोलण्यास बंदी आहे, पण हे भान किती तरुण ठेवतात? बोलताना आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास तर होत नाही ना, हे आपण पाहतो का? काय बोलावे व काय बोलू नये, याची जाणीव आपल्याला असते का?
अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट, अपघात, नैसर्गिक आपत्ती इत्यादी घटना सर्वांना हादरून, गोंधळून टाकतात. अशा वेळी मोबाईलचा वापर जपून करावा लागतो. अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागते. मोबाईल यंत्रणा जाम होणार नाही, हे पाहावे लागते. आपण हे करतो का? नाही. आमच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर होत असलेली ही आक्रमणे, हे आघात चालूच राहणार आहेत. आपण त्यात जे चांगले आहे तेच घेतले पाहिजे. मोबाईल संस्कृती स्वीकारताना हे लक्षात ठेवले पाहिजे एवढेच.
- संजीव पेंढरकर
viccolabs@satyam.net.in